मुंबई: राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून त्यांनी अनेक विषयात न्यायालयाच्या थपडा खाल्ल्या आहेत. तरीदेखील ठाकरे सरकारचे अनेक नेते न्यायालया विरोधात आगपाखड करताना दिसत असतात. आज न्यायालयाने या अशा प्रकारच्या विधानांना महत्त्व देत नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या वाचतो आणि त्यांना केराची टोपली दाखवतो असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय कौल यांनी म्हटले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या प्रकरणातील सुनावणी दरम्यान त्यांनी हे भाष्य केले.
माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांनी आम्हाला फरक पडत नाही. महाराष्ट्रातील काही नेत्यांनी काल माध्यमांसमोर काही विधाने केली. त्याच्या आज बातम्या छापून आल्या आहेत. यामध्ये त्यांना न्यायालयाकडून योग्य ती वागणूक मिळत नसल्याचे म्हटले आहे. आम्हाला याची सवय झाली आहे. पण आम्ही अशा बातम्या वाचतो आणि त्यांना केराची टोपली दाखवतो असे कौल यांनी म्हटले आहे. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा इशारा हा संजय राऊतांकडे असण्याची शक्यता आहे. राऊत यांनी काल माध्यमांसमोर येऊन न्यायालयावर टीका केली होती. न्यायालयाचा दिलासा फक्त ठराविक लोकांना मिळतो असे राऊत यांनी म्हटले होते.
या वरूनच भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘न्यायमूर्तींनी संजय राऊतांच्या भावनांना केराची टोपली दाखवली.’ असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
परमबीर सिंग यांच्या प्रकरणाशी संदर्भात आज सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होत होती. परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकल्यानंतर महाराष्ट्रात मोठा गौप्यस्फोट झाला होता. परमबीर सिंग यांनी कोर्टात धाव घेत याचिका केली होती. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या गुन्ह्यांचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार या प्रकरणात न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिला असून हा तपास सीबीआयने करावा असे आदेश दिले आहेत.