कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात येत आहे. या लाटेचा सर्वाधिक परिणाम मुंबई आणि पुणे येथे जाणवणार असून या दोन शहरांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद केली जाऊ शकते. तर राज्यात बाधितांची संख्या ६० लाखाच्यावर जाऊ शकते असे महत्वपूर्ण निरीक्षण सार्वजनिक आरोग्य विभागाने नोंदवले आहे.
दुसऱ्या लाटेत ११ मार्च रोजी दिवसाला ९१,१०० कोरोना रुग्णांची भर पडत होती.हाच आकडा तिसऱ्या लाटेत मुंबईसाठी दिवसाला १ लाख ३६ हजार रुग्णांपर्यंत पोहोचू शकतो.पुण्यात १९ मार्च रोजी दिवसाला १.२५ लाख रुग्णांची नोंद झाली होती.तिसऱ्या लाटेत हीच संख्या तब्बल १.८७ लाख रुग्णांपर्यंत पोहोचू शकते.
असेही आरोग्य विभागाने म्हंटले आहे. त्यामुळे या दोन शहरातील बाधितांची संख्या नियंत्रणात किंबहुना या लाटेवर मत करण्यासाठी आरोग्य विभागाला सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याची गरज असून त्या दृष्टीने काम सुरू असल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले.
तिसऱ्या लाटेच्या अंदाजात मुंबईत व्यक्त करण्यात आलेले शिखर हे १.३६ लाख रुग्णांचे आहे.यात ८८ हजार ८२३ रुग्णांना होम क्वारंटाइन, ४७ हजार ९२८ रुग्णांना रुग्णालयात आणि ९५७ रुग्णांना अतिदक्षता विभागातील खाटांची गरज भासू शकते.तर पुण्याच्या बाबतीत १.२१ लाख रुग्णांवर होम क्वारंटाइन आणि १३१४ रुग्णांना अतिदक्षता खाटांची गरज भासू शकते.ठाण्यातही तशीच काहीशी परिस्थिती असून तिसऱ्या लाटेत बाधितांची संख्या १.३ लाखांपर्यंत पोहोचू शकतो आणि ९११ जणांना अतिदक्षता खाटांची गरज भासू शकते.