प्रथम महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा ‘नांदेड’ महाराष्ट्र २०२२
नागपूर :- नांदेड येथे सुरू असलेल्या पहिल्या राज्य मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत नासिकच्या चवथा मानांकित कुशल चोपडा याने ठाण्याच्या सहाव्या मानांकित स्वस्तिक अथनीकर याचा ११-३, ११-७, ११-७, ११-६ असा ४-० पराभव करून १७ वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद मिळविले.
अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी उपांत्य फेरीत कुशलने या स्पर्धेतील प्रथम मानांकित ठाण्याच्या आशय यादवचा १०-१२, ११-७, ११-७ ११-९, ११-५ असा ४-१ ने सहज पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुस-या उपांत्य फेरीच्या सामन्यात ठाण्याच्या स्वस्तिक अथनीकरने बिगर मानांकित टीएसटीटीए ध्रुव शाहचा ११-८, ११-७, ९-११, ४-११, ११-४,११-८ असा ४-२ ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला परन्तु शेवटी अंतिम फेरीत त्याला कुशल चोपडा समोर हार मानावी लागली.
१७ वर्षाखालील मुलींच्या गटात नागपूरच्या तिस-या मानांकित “जेनिफर वर्गीस” ने या स्पर्धेतील अजिंक्यपद मिळवितांना प्रथम मानांकित नासिकच्या तनिशा कोटेचा हीचा ६-११, ११-७, १२-१०, ११-५, ११-९ असा ४-१ ने पराभव करून विजेतेपदावर आपला कब्जा केला.
अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी जेनिफर वर्गीसने पुण्याच्या दुस-या मानांकित पृथा वर्टीकरचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत ६-११, ४-११, ११-७, ११-६, १३-११, ६-११, ११-८ असा ४-३ ने पराभव केला. पहिल्या दोन जेनिफेरने गेम गमावल्या नंतर पुढील तीन गेम जिंकून एक गेमने आघाडी घेतली. पुन्हा सहावा गेम जिंकून पृथा वर्टीकर ने बरोबरी करत आपले आव्हान टिकवले. परंतु शेवटचा गेम जेनिफरने ११-८ गुणांनी जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करत विजेतेपद मिळविले. दुस-या उपांत्य फेरीच्या सामना हा नासिकच्या तनिशा कोटेचा व सायली वाणी यांच्यात झाला. पहिले दोन गेम जिंकून तनिशाने २-० अशी बढत घेतली परंतु सायलीने प्रकृति बरी नसल्याने स्पर्धेतून माघार घेत तनिशाला पुढे चाल दिली परंतु तनिषाला अंतिम फेरीत पोहोचूनही त्याचा फायदा घेता आला नाही आणि पराभवाला सामोरे जावे लागून उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. पहिल्या झालेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या टेबल टेनिसपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली त्यात तनिशा कोटेचा हीने महिला एकेरीत विजेतेपद तर १९ व १७ वर्षाखालील मुलींच्या गटात उपविजेतेपद मिळविले तसेच सायली वाणीने या स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद तर महिला एकेरीत उपविजेतेपद मिळविले. तसेच कुशल चोपडाने या स्पर्धेत १७ व १९ वर्षाखालील मुलांच्या गटात अनुक्रमे विजेते व उपविजेतेपद मिळविले. विजेत्या खेळाडूंना चषक व रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ नांदेड एज्युकेशन सोसाटीचे उपाध्यक्ष डॉ. प्रवीण पाटील (सीए) यांच्या शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण, कार्यकारी अध्यक्ष रामलू पारे, सचिव डॉ. अश्विन बोरीकर, सतीश बोरीकर, उत्तम इंगळे, जयप्रकाश फरोल, एम्त्याज खान, टेबल टेनिस मार्गदर्शक अनिल बंदेल आदी मान्यवर, खेळाडू, पालक व क्रीडा प्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विन बोरीकर यांनी केले.