तामिळनाडूमधील कुन्नूर येथील हेलिकॉप्टर अपघातात भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह 14 वरिष्ठ अधिकार्यांचा मृत्यू झाला होता.
या अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल आता समोर आला आहे. या अहवालात जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघात खराब हवामानाने झाल्याचे नमूद केले आहे.
8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल न्यायालयातही सादर करण्यात आला आहे. ‘फ्लाईट डेटा रेकॉर्डर’ आणि ‘कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर’चाही अभ्यास चौकशी समितीने केला होता.
अपघातामागे घातपात किंवा यांत्रिक बिघाड ही कारणे असल्याच्या सर्व शक्यता समितीने फेटाळून लावल्या आहेत. अपघाताला अचानक बदललेले हवामान आणि हेलिकॉप्टर ढगांमध्ये जाणे मुख्यत्वे जबाबदार असल्याचा निष्कर्ष अहवालातून काढण्यात आला आहे.