वॉशिंग्टन – चीन आणि पाकिस्तानला भाजपशासित केंद्र सरकारनेच एकत्र आणल्याचा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला दावा अमेरिकेने फेटाळून लावला आहे.
पाक आणि चीनच्या संबंधांवर या दोन्ही देशांनीच भाष्य करायला पाहिजे. मात्र आपण या दाव्याचे समर्थन अजिबात करणार नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी हे मत व्यक्त केले.
चीन आणि अमेरिका या दोन्हीपैकी एका देशाची निवड करावी, अशी कोणत्याही देशाला गरज नाही, जर एखाद्या देशाला अमेरिकेबरोबर चांगले संबंध हवे असतील तर तो पर्याय खुला ठेवणे हे अमेरिकेचे काम आहे, असेही प्राईज यांनी एका अन्य प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
चीन आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध गेल्या काही काळापासून खालावले आहेत. व्यापार, दक्षिण चीन समुद्रातील चीनची घुसखोरी, तिबेट, हॉंगकॉंग आणि शिन्झियांग प्रांतातील मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या मुद्दयावरून दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. तर पाकिस्तानबरोबरचे अमेरिकेचे संबंधही अनेक मुद्द्यांवरून ताणले गेले आहेत.
भारत सरकारने पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांना एकत्र येऊ द्यायला नको असताना, केंद्र सरकारच्या विदेश धोरणांमुळे हे दोन्ही देश एकत्र आल्याचा दावा राहुल गांधी यांनी काल लोकसभेमध्ये केला होता.