काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यूपीए सरकारने ७० वर्षांच्या काळात उभ्या केलेल्या सर्व गोष्टी भाजप सरकार विकत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्यानंतर स्मृती इराणी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना स्मृती इराणी म्हणाल्या,“महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या कामातून ८,००० कोटी रुपयांची कमाई केली होती. आता आम्ही राहुल गांधी यांच्या आरोपाचा असा अर्थ लावायचा का की, राज्य सरकारने ते विकलं आहे?”, असा सवाल स्मृती इराणी यांनी उपस्थित केला आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारने २००८ मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्थानकासंदर्भात आरएफपी जारी केली होती. २००६ मध्ये विमानतळाचे खासगीकरण सुरू करण्यात आले होते. “मग आपल्या आईच्याच नेतृत्वाखालील सरकारने रेल्वे, रस्ता आणि विमानतळ विकले असा राहुल गांधी यांचा आरोप आहे का?” असा सवाल देखील स्मृती इराणी यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारचा राजकीय चेहरा म्हणून पाहिलं जायचं, याच संदर्भाने हे विधान करण्यात आले आहे.
भाजप सरकारच्या कार्यकाळात देश गुलामीच्या दिशेने वाटचाल करत आहे या राहुल गांधी यांच्या आरोपाला उत्तर देताना स्मृती म्हणाल्या की, “खरे गुलाम तर ते आहेत जे कौटुंबिक राजवटीसाठी देश तोडण्याची भाषा करतात.” यावेळी स्मृती इराणी यांचा रोख पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या दोन सल्लागारांनी काश्मीर आणि पाकिस्तानबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याकडे होता.