शरद पवारांचा विक्रम गोखलेंना टोला
भारताच्या स्वातंत्र्याबद्दल अभिनेत्री कंगना रनौतने केलेल्या विधानावरून निर्माण झालेल्या वादाची धूळ खाली बसत नाही, तोच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाला समर्थन दिलं. त्यामुळे नव्याने या वादाला तोंड फुटलं असून, विक्रम गोखले यांनी मांडलेल्या भूमिकेवर शरद पवारांनी टोला लगावला आहे. ‘अशा लोकांच्या अशा वक्तव्यांची दखलही घ्यावी वाटतं नाही’, असं पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळ अधिवेशनात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमापूर्वी शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी शरद पवार यांना अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगना रनौतचं समर्थन करण्याबद्दलच्या मुद्द्यावरून पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना समाजात विकृती मनोवृत्तीचे लोक असतात, त्यांची दखल घ्यायची नसते, असं म्हणत टोला लगावला.
शरद पवार म्हणाले, ‘ज्यांच्याबद्दल तुम्ही बोललात, अशांच्या अशा वक्तव्यांची नोंद सुद्धा घ्यावी असं मला वाटतं नाही. त्याची नोंद आपण घेऊ नये. शेवटी समाजात असे काही लोक असतात. शेवटी समाजात ज्याला इंग्रजीमध्ये परवर्ट (pervert) म्हणतात अशी एक मनोवृत्ती असते. म्हणून त्याची आपण दखल घ्यायची नसते. सोडून द्यायचं असतं”, असं म्हणत शरद पवार यांनी विक्रम गोखलेंवर निशाणा साधला