मुंबई: शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यात आदित्य ठाकरे पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. तर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकींचा आणि गाठीभेटींचा धडाकाच लावला आहे.अनेक वर्षांनंतर ते शिवसेना शाखेतही जाताना दिसून येत आहेत. उद्धव ठाकरेंनी रविवारी शिवडी विधानसभा मतदार संघातील शिवसेना शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना भाजपा आणि बंडखोर नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच, शिवसेना फोडण्याचा नाही, तर संपविण्याचा हा डाव असल्याचंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना उद्देशून भाषण करताना भाजपवर जोरदार प्रहार केला. शिवसेना फोडण्याचा नाही, तर हा संपविण्याचा डाव आहे. मात्र, शिवसेना पुरुन उरेल आणि संपविणाऱ्यांना पाताळात गाडेल, अशा शब्दात भाजपवर हल्लाबोल केला. “अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण आजचा जो प्रयत्न आहे तो फोडण्याचा नाही, तर शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना आणि ठाकरे हे नातं त्यांना तोडायचं आहे. पण नातं जर तोडायचं असेल तर हे जे आज स्वत:ला मर्द समजत आहेत. हे बंडखोर नाहीत ते हरामखोर आहेत. त्यांनी हरामीपणा केला आहे. तुमच्यात एवढी जर मर्दुमकी असेल तर निवडणुकीला सामोरं जा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.