उपराजधानी असलेल्या नागपुरात चोरट्यांनी भाजप नगरसेवकाच्या घरातील तिजोरी लंपास केली. तिजोरीत 40 ते 50 तोळे सोने, गोल्ड प्लेटेड घड्याळ आणि इतर मौनल्यवान वस्तू होत्या. हा प्रकार नागपूरमधील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. भाजपचे नगरसेवक संदीप गवई यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. रविवारी (दि.24) सकाळी उघडकीस आलेल्या घटनेमुळे नागपूर शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
भाजप नगरसेवक संदपी गवई हे रमा नगर, शताब्दी चौक परिसराचे नेतृत्व करतात. ते गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हजारिपहाड परिसरात राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर रोजी ते नागपूर बाहेर गेले होते. त्यावेळी घरात त्यांचे नातेवाईक होते. 22 ऑक्टोबरला ते परत आले. आज (24 ऑक्टोबर) त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्याकडे चोरी झाल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
गवई यांच्या खोलीमध्ये असलेली तिजोरी चोरट्यांनी उचलून नेली. या तिजोरीत 40 ते 50 लाखांचा किमती ऐवज होता असे समजतेय. या धाडसी चोरीचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी गवई यांच्या निवासस्थानी गर्दी केली. पोलिसांनी श्वान तसेच ठसे तज्ज्ञांचे पथक बोलवून घेतले. घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे.
धाडसी चोरीबाबत पोलिसांना संशय
चोरीची घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी गवई यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यामुळे या धाडसी चोरीत अनेक संशयास्पद पैलू आहेत. चोरट्यांनी घरातील कोणत्याच दुसऱ्या वस्तूंना हात लावला नाही किंवा छेडछाड केली नाही. फक्त तिजोरीच उचलून नेली. ही बाब पोलिसांना खटकत आहे. त्यामुळे या प्रकरणात संपर्कातीलच व्यक्ती असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. महत्त्वाचे म्हणजे गवई दोन दिवसांपूर्वी घरी परतले आणि त्यांनी आज चोरीची माहिती पोलिसांना कळवली. या दोन दिवसात त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे कसे समजले नाही, याच मुद्यावरुन पोलिसांनी तपास सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे.