भाजपचा थेट चीनला इशारा
भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू नुकतेच अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते. यावर चीनने आक्षेप घेतला होता. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भारताचे राजकारणी नियमितपणे इतर कोणत्याही राज्याप्रमाणे अरुणाचल प्रदेशला भेट देतात. भारतीय नेत्यांच्या भारताच्या राज्याच्या दौऱ्यावर घेण्यात आलेल्या आक्षेपाचं कारण समजण्यापलीकडे आहे, असं प्रत्युत्तर परराष्ट्र मंत्रालयाने चीनला दिले आहे. दरम्यान यावरून आता भाजपाकडूनही प्रतिक्रिया येत आहेत.
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणावरून आपल्या ट्विटच्या माध्यमातून थेट चीनलाच इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की,’अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि युद्धाच्या पोकळ धमक्या द्यायला हा नेहरूंचा नाही तर मोदीजींचा नवा भारत आहे हे चीनने लक्षात ठेवावे.’
दरम्यान, भारताने बेकायदेशीरपणे स्थापन केलेल्या तथाकथित अरुणाचल प्रदेशला चीन मान्यता देत नाही आणि भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्याला तीव्र विरोध करतो, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले होते.