आतंकवादी दाऊदशी संबंध असणारे मंत्री नवाब मलिक हेदेखील देशद्रोही आहेत. या देशद्रोही मंत्र्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणारे हे पहिलेच सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशभक्तीपेक्षा सत्तेची खुर्ची महत्त्वाची असल्याने त्यांचेही हात बांधले गेले असल्याची टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.
सोलापुरात हेरिटेज येथे मंगळवारी भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख उपस्थित होते. श्री. दरेकर म्हणाले की, मुंबई बॉम्बस्फोट घडवून शेकडोंचे बळी घेणारा आंतकवादी दाऊद इब्राहीम व त्याच्या टोळीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू होता. या तपास यंत्रणेमध्ये दाऊदच्या टोळीने कुर्ला येथील तिनशे कोटी रुपयांचा भूखंड बळकाविल्याचा गुन्हा आढळला. या गुन्ह्यात नवाब मलिक यांचा सहभाग आढळला.
ईडीच्या तपास यंत्रणेच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई सुरू आहे. मात्र नैतिक जबाबदारी स्वीकारून नवाब मलिकांनी राजीनामा दिला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील त्यांना मंत्रिपदावरून काढले नाही. मलिक राजीनामा देणार नाहीत, अशी भूमिका सत्ताधारी महाविकास आघाडीने घेतली. राज्याचे मंत्रीमंडळ नवाब मलिकांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणारे हे पहिलेच सरकार ठरले. देशद्रोह्याला जातीय रंग देऊ नये. देशद्रोह्याला जात नसते. केवळ केंद्रावर, ईडीवर टिका करून चालणार नाही. देशद्रोह्यांसाठी पक्ष न पाहता कारवाईची गरज आहे, असेही श्री दरेकर म्हणाले.