अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिक यांना धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील कार्यालयात सकाळी 7.15 दरम्यान हा फोन आला असून सुरेश हुडा, असे या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती आहे.
हा फोन राजस्थानमधून केल्याचेही पुढे आले आहे. दरम्यान, फोन करणाऱ्या व्यक्तीने समीर वानखेडे चांगले काम करत आहेत. त्यांना अडथळा निर्माण करू नका, अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी नवाब मलिकांना दिली आहे.
आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. नवाब मलिक यांनी क्रूजवर टाकण्यात आलेल्या छाप्यावर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. कोरोना काळात सगळे सेलिब्रिटी मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय मालदीवमध्ये होते, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला होता. तसेच त्यासंदर्भातले फोटोदेखील आपण देणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले होते. याप्रकरणात समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे थेट आव्हान मंत्री नवाब मलिक यांनी दिले होते.