हेलिकॉप्टरमधून आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे
तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला असून ते पूर्णपणे जळून राख झालं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत यांच्यासह 14 जण होते. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात झाला असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
लष्कर आणि स्थानिक पोलीस अधिकारी अपघातस्थळी पोहोचले आहेत. दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीने हा संपूर्ण प्रकार नेमका सांगितला. कृष्णसामी असे या प्रत्यक्षदर्शीचे नाव आहे. त्याने या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, त्याला सर्वात आधी प्रचंड मोठा आवाज ऐकू आला. आवाज खूप मोठा असल्याने तो तात्काळ घरातून बाहेर आला. यावेळी त्याला जे दृश्य दिसलं ते खूपच भयंकर होतं. त्याने पाहिले की, एक हेलिकॉप्टर एका दुसऱ्या झाडावर प्रचंड वेगाने आदळत होतं. यावेळी संपूर्ण हेलिकॉप्टरला आग लागली होती.
‘जळत्या हेलिकॉप्टरमधून 2-3 जणांनी घेतल्या होत्या उड्या’
कृष्णासामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर झाडावर आदळत असताना त्याला आग लागली होती. यादरम्यान कृष्णसामी यांनी 2 ते 3 लोकांना हेलिकॉप्टरमधून उड्या मारताना पाहिले. यावेळी हे सर्व जण आगीत भाजून निघत होते. दरम्यान, घटना प्रचंड गंभीर असल्याने कृष्णसामी यांनी तातडीन जवळ असलेल्या लोकांना एकत्र केलं आणि तात्काळ बचावकार्य सुरू केलं. दरम्यान, सापडलेल्या सर्व मृतदेहांपैकी 80 टक्क्यांहून अधिक जळालेले आहेत. त्यामुळे त्यांची नेमकी ओळख अद्याप पटलेली नाही.
सीडीएस बिपिन रावत जात होते वेलिंग्टनला
मात्र, सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. भारतीय हवाई दलाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपघाताबाबत कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. M सीरीजचे हे हेलिकॉप्टर सीडीएस जनरल बिपिन रावत यांना वेलिंग्टनमधील डिफेन्स स्टाफ कॉलेजमध्ये घेऊन जात होते.
कोईम्बतूरमधील अधिकृत सूत्रांनी सांगितले की, डोंगराळ भाग असलेल्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरजवळील कट्टेरी-नंचप्पनचत्रम भागात कोसळलेल्या हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्याखालून 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, दाट धुक्यामुळे कमी दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टर जंगलात कोसळले असावे.
लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटनेत 14 पैकी 13 जणांचा मृत्यू
तमिळनाडू मध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर डीएनए चाचणीच्या माध्यमातून मृतांची ओळख पटवली जाईल असे ही सांगण्यात आले आहे. तर लष्कराच्या हेलिकॉप्टरलमध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी होते