संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने 3 मे हा जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन किंवा फक्त जागतिक पत्रकार दिन म्हणून घोषित केला, वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि सरकारांना त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा आदर आणि संरक्षण करण्याच्या त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी साजरा केला जातो.
पत्रकारांच्या स्वातंत्र्याचं महत्व लोकांना पटावे आणि याविषयी जनमानसात जागृती निर्माण व्हावी यासाठी १९९३ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत ३ मे हा दिवस “जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध विचारधारेची वृत्तपत्रं जगभर निघत असतात. त्यांची वैचारिक गळचेपी होऊ नये म्हणून हा दिवस जागतिक वृत्तपत्र-स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जातो. यामागचा उद्देश जनतेमध्ये माध्यमांप्रती जागरुकता निर्माण करणे हा आहे.
१९९१ मध्ये आफ्रिकेतील पत्रकारांनी पत्रकारांच्या स्वातंत्र्यासाठी पुढाकार घेऊन एका विशेष मोहिमेला सुरुवात केली. ३ मे १९९१ रोजी नामिबियाची राजधानी विंडहोक येथे पत्रकारांची परिषद भरली होती. या परिषदेत पत्रकारांच्या लिखाणाच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्याच्या पुढील वर्षांपासून (१९९२ सालापासून) ३ मे हा दिवस ‘प्रेस फ्रिडम डे’ (पत्रकारिता स्वातंत्र्य दिन) म्हणून साजरा केला जाऊ लागला.
१९९३ मध्ये ‘युनेस्को’ने ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्यास मंजुरी दिली. ‘युनेस्को’तर्फे १९९७ सालापासून दरवर्षी ३ मे रोजी ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिना’ निमित्त ‘गिलेरमो कानो वर्ल्ड प्रेस फ्रिडम प्राईज अॅावॉर्ड’ दिले जाते.
पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या पत्रकाराला हा पुरस्कार प्रदान केला जातो. या वर्षी फिलीपिन्सचे पत्रकार आणि मीडिया कार्यकारी ‘मारिया रेसा’ यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यानिमित्ताने माध्यमांचे स्वातंत्र्य, पत्रकारांची सुरक्षितता आदी विषयांवर जगभर चर्चा होते. दर वर्षी एखादी थीम ठरवून, त्यासंबंधीही विचार विनिमय केले जाते. या वर्षाची थीम आहे: ‘Information as a Public Good’ दर वर्षी या दिवशी वेगळ्या देशात वृत्तपत्र स्वातंत्र्य विषयक थीमवर परिषद भरवली जाते.