वर्धा: वर्धा जिल्ह्यातील बहुचर्चित हिंगणघाट तालुक्यात घडलेल्या जळीतकांड प्रकरणात प्रतीक्षेत असलेला निकाल आज 9 फेब्रुवारीला येणार आहे. 5 फेब्रुवारीला निकाल येणार होता. पण निकाल देण्यास न्यायालयाने असमर्थता दर्शवल्याने 9 फेब्रुवारीला निकाल निश्चित देणार, अशी माहिती सरकरी वकील यांनी दिली होती.
आरोपी विकेशला फाशीची द्या, अशी मागणी केली जात असली तरी आरोपीला फाशी होणार की जन्मठेप हे न्यायाधीशांच्या निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात 21 जानेवारी 2022 ला दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पुढच्या तारखेला निकाल देणार असल्याची माहिती न्यायमूर्तींनी सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली होती. राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या पीडित प्राध्यापिकेला जाळण्याचा घटनेला 3 फेब्रुवारीला दोन वर्षे पूर्ण झाले आहे. यात दोन वर्षांपासून असणारी प्रतीक्षा आता संपणार आहे.
काय घडले होते ‘त्या’ दिवशी
पीडित तरुणी ही हिंगणघाट येथील महाविद्यालयात कार्यरत होती. घटनेच्या दिवशी कॉलेजला जाताना आरोपी विकेशने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात गंभीर भाजल्या गेल्याने 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षण सत्यविर बंडीवार यांनी २८ फेब्रुवारीला आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल ४२६ पानांचे दोषारोपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले. पण जलदगती न्यायालयात प्रकरण चालणार असताना कोविडमुळे जवळपास 9 महिने कामकाजाला विलंब झाला. कोरोनाची पहिली लाट शांत होताच 14 डिसेंबर 2020 पासून सुनावणीला सुरुवात झाली. या प्रकरणाचा निकाल आज लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.