तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील पहिली स्वतंत्र वृत्तवाहिनी असणाऱ्या टोलो न्यूजच्या पत्रकाराची हत्या केल्याची बातमी समोर आली होती. पण या पत्रकाराने थोड्याच वेळात ट्विटरवरुन खुलासा करत आपल्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचे म्हटलं असून आपले प्राण वाचल्याचे स्पष्ट केले आहे.
या मारहाणीसंदर्भात सर्वात आधी टोलो ग्रुपने माहिती दिली आणि त्यानंतर अनेक प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील वृत्तांकन केल्यानंतर या पत्रकाराचे ट्विट समोर आले आणि तो जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पत्रकाराला देशाची राजधानी असणाऱ्या काबूलमध्ये मारहाण झाली.
मारहाण करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव झिअर याद खान असे आहे. खान आणि एका कॅमेरामन काबूलमधील बेरोजगारी, गरीबी आणि दारिद्र्य या विषयावर वृत्तांकन करत होते. त्यावेळी तालिबान्यांनी त्यांना पकडले आणि बेदम मारहाण केली. हजी याकूब परिसरामध्ये ही घटना घडली.