बीडमध्ये उद्या होणारा दसरा मेळावा हा कोणत्याही जातीपातीचा नाही. कोणत्याही वर्गाचा नाही. हा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा, वंचितांचा मेळावा आहे, असं सांगतानाच या मेळाव्याला येणारा कार्यकर्ता हा विचारांची ऊर्जा घेऊनच जातो, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
उद्या बीड येथील भगवान गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला पंकजा मुंडे या संबोधित करणार आहेत. या मेळाव्याच्या तयारीबाबत पंकजा मुंडे यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. दरवर्षी दसरा मेळावा आगळावेगळा असतो. हा मेळावा लोकांच्या आदेशावरून आणि आग्रहावरून होत असतो. यावेळचं स्वरूप किती सुंदर आणि देखणं आहे हे केवळ तिथे येणाऱ्या लोकांवर अवलंबून आहे. मला विश्वास आहे मेळावा आगळावेगळा असेल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
राजकारणाचा मूलमंत्र
बीडमध्ये दसऱ्याला भगवान बाबांच्या भक्तीचा मेळा जमतो. दरवेळी हा व्हिडीओ उत्सफूर्तपणे येतो. हृदयातून निघालेला संवाद हृदयापर्यंत पोहोचतो. हीच खरी नेतृत्वाची ताकद असते. ही भक्तीची परंपरा आहे, ती नैसर्गिक आहे. लोकांनी मला आदेश द्यायचा आणि मी स्वीकारायचा हा माझ्या राजकारणाचा मूलमंत्र आहे. तुम्ही सांगायचं आणि मी करायचं… माझ्या मनात ही चार वाक्य आली आणि त्याचा व्हिडीओ झाला. लोकं खूप मोठ्या संख्येने तो व्हिडीओ बघत आहेत, असं त्या म्हणाल्या.