कोरोना विषाणूचा नवा व्हेरीएंट ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. यामध्ये परराज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचे ट्रॅकिंग व टेस्टिंग करा व लसीकरणाचा वेग वाढवा.असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीज कलमी सभागृहात ओमिक्रॉन संदर्भाने करावयाच्या नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिताली सेठी, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, कोरोनाचा नवा व्हेरीएंट ओमिक्रॉन आढळल्याने पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 88 टक्के लसीकरण झाले आहे, परंतू काही नागरिकांचा अद्यापही पहिला व दुसरा डोस शिल्लक आहे. अशा नागरिकांचे लसीकरण करून घेत लसीकरणाचा वेग वाढवावा. प्रशासनाने पूर्वतयारी म्हणून ऑक्सिजन व बेडची उपलब्धता करावी. समन्वय ठेवत, योग्य नियोजन करून आपल्या स्तरावर पाहिजे ती योग्य काळजी घ्यावी. बाहेरून येणाऱ्यांना होम क्वारेन्टाईन करावे. असेही ते म्हणाले.