केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांना केलेल्या फोनचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकारानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट बेकायदा ठरल्यानंतर आता वांद्रे पूर्वेकडील कार्यालयावर कारवाईचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. दरम्यान, राज्य सरकारमधील परब यांच्यासहित किमान 11 मंत्र्यांवर गंभीर आरोप सोमय्या यांनी करत महाविकास आघाडी सरकारचा डेरा डळमळीत करण्याचे काम केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील नेते रडारवर
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपने सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले आहे. तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सरकारमधील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करत विविध प्रकरण चव्हाट्यावर आणली आहेत. आता सोशल मिडियाच्या माध्यमातून 11 नेत्यांची नावे किरीट सोमय्या यांनी जाहीर केली. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना लवकरच ईडी ( सक्तवसुली संचालनालय) किंवा सीबीआय कारवाई करुन अटक करणार असल्याची भाकित सोमय्या यांनी वर्तवले आहे. येत्या काळात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या चौकशीचा सिलसिला पहायला मिळणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले होते.
परबांच्या अडचणी वाढणार
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी वांद्रे पुर्वेकडील गांधी नगरमधील इमारत क्रमांक 57 आणि 58 मधील मोकळी जागा बळकावून अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी लोकायुक्तांकडे दाद मागितली होती. लोकायुक्तांनी याबाबत झालेल्या सुनावणीवेळी गृहनिर्माण विभागाला एका महिन्याच्या आत कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती सोमय्या यांनी प्रसार माध्यमांना दिली. म्हाडाने यासंदर्भात यापूर्वी नोटीस बजावल्या होत्या. त्यावेळी संबंधित अनधिकृत बांधकामाशी माझा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर म्हाडाने त्या मागे घेतल्या. आताही म्हाडाकडून योग्य कारवाई होईल, असे सांगत परिवहन मंत्री परब यांनी हात झटकले आहेत