नागपूर: आर्थिक रसातळाला गेलेल्या श्रीलंकेमधील तणाव पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतरही कायम आहे. आता राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, पंतप्रधान राजपक्षे यांच्यासह १२ अन्य नेत्यांना देश सोडून जाण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. दरम्यान, राष्ट्रपती गोटबाया यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करत विरोधी पक्षांबरोबर चर्चा करणार असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.
गोटबाया यांनी देशातील अशांती संपविण्यासाठी सुचवले चार पर्याय
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया यांनी चार ट्विट करत देशात अशांती संपविण्यासाठी पर्याय सुचवले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, देशात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. सरकार स्थापन झाल्यास देश अराजकतेच्या गर्तेत जाणार नाही. भविष्यातील रणनीती ठरविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे शक्य होईल. त्याचबरोबर पंतप्रधानही नियुक्त केले जातील.
नवीन सरकारला देशाच्या पुढील वाटचालीसाठी नवीन योजना आखण्यासाठी वेळ दिला जाईल. घटनादुरुस्ती करुन देशाला आणखी मजबूत केले जाईल. विरोधी पक्षांच्या मागणीनुसार लवकर विरोधी पक्षांबरोबर बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी म्हटलं आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्ता वाचविण्यासाठी आणि देशाला वाचविण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणे गरजेचे आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वांचे सहकार्याची गरज आहे, असेही त्यांनी ट्विट केले.
महिंदा राजपक्षेंना अटक करा : विरोधी पक्षांची मागणी
श्रीलंका आजवरच्या भयंकर आर्थिक संकटातून जात आहे. देशातील परिस्थिती हाताळण्यास राजपक्षे यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देशभरात पंतप्रधान राजपक्षे यांच्या विरोधात देशभरात आंदोलन होत आहे. त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षाचे नेते करत आहेत. महिंदा राजपक्षे हे २००५ ते २०१५ या काळात देशाचे राष्ट्रपती होते. याच काळात त्यांनी लिबरेशन टायगर्स ऑफ ममिल ईलमच्या दहशवादी संघटनेविरोधात जोरदार लष्करी मोहिम राबवली होती. यानंतर देशातील लोकप्रिय नेता अशी त्यांची ओळख बनली होती.