करोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवे आदेश काढले. यानुसार, विविध आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना व तिथे येणाऱ्या सर्व नागरिकांना करोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक असेल. तर काही ठिकाणी किमान एक लसमात्रा आवश्यक आहे. हा आदेश ९ नोव्हेंबरपासून लागू होईल.
आयुक्तांच्या आदेशानुसार धार्मिक स्थळी काम करणारे संपूर्ण व्यवस्थापन, कर्मचारी तसेच प्रवेश करणाऱ्या नागरिकांनाही करोनाच्या दोन लसमात्रा पूर्ण होणे आवश्यक असेल. लसीकरण प्रमाणपत्र व फोटो ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील. सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने, धार्मिक यात्रा, उत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्याही दोन लसमात्रांचे बंधन असेल. सरकारी, निमसरकारी व खाजगी कार्यालये, तत्सम संस्थांमध्ये कार्यरत कर्मचारी, अधिकारी, कामानिमित्त येणारे १८ वर्षांवरील सर्व अभ्यागतांना दोन मात्रा किंवा किमान पहिली लस मात्रा घेतलेली असणे आवश्यक असेल.
शहरातील सर्व उद्याने, वाचानालये, अभ्यासिका, मंगल कार्यालय, लॉन, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या सर्व १८ वर्षांवरील नागरिकांनी किमान एक लसमात्रा घेतली असणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था आदीमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दोन लसमात्रा पूर्ण होणे आवश्यक राहील.
सार्वजनिक परिवहन व्यवस्थेअंतर्गत येणाऱ्या महामंडळ, शहर बस वाहतूक, ऑटो-रिक्षा याद्वारे प्रवास करणाऱ्या १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. बाजार व दुकानांचे मालक व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही लसीच्या दोन मात्रा पूर्ण झालेल्या असणे आवश्यक आहे.