नवी दिल्ली: देशांतर्गत कोळसा उत्पादन वाढवणे, विशेषत: येणाऱ्या पावसाळ्यात कोळशाचा निरंतर पुरवठा सुरु राहण्याच्या अनुषंगाने, उत्पादन वाढवण्याला हे कोल इंडिया लिमिटेडच्या सर्व उपकंपन्यांसाठी प्राधान्य असले पाहिजे, असे केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
अंदाजे 12,500 कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीसह 35 फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी (एफएमसी ) प्रकल्प प्राधान्याने पूर्ण केले जातील, असे जोशी यांनी जाहीर केले. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत महाराष्ट्रातील चंद्रपूरात धोपटला येथील खुल्या खाणीच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी प्रकल्पाची पायाभरणी आभासी माध्यमातून करताना जोशी म्हणाले की, कोळसा गॅसिफिकेशन (वायूकरण ) प्रकल्पांना कोळसा मंत्रालय सर्वाधिक प्राधान्य देत आहे आणि आत्मनिर्भर भारतावर लक्ष केंद्रित करून कोळसा गॅसिफिकेशनसाठी खाजगी कंपन्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आज सुरू झालेल्या दोन प्रकल्पांची एकत्रित गुंतवणूक 1190 कोटी रुपये आहे.बल्लारपूर क्षेत्राच्या धोपटला खुल्या खाणीची कोळसा क्षमता प्रतिवर्षी 2.50 दशलक्ष टन असेल आणि 720. 87 कोटी रुपयांचा खर्च यात समाविष्ट आहे. 53.11 मेट्रिक टन कोळशाचा साठा असलेल्या या खुल्या खाणीतून थेट 795 रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत आणि या प्रकल्पासाठी जमिनीची आवश्यकता 1257.46 हेक्टर आहे.
वणी परिसरातील फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी प्रकल्पाची क्षमता प्रतिवर्ष 8 दशलक्ष टन असेल आणि यात विविध विभागांसाठी 471 कोटी रुपयांची गुंतवणूक समाविष्ट आहे. रस्ते वाहतुकीद्वारे कोळसा वाहून नेण्यासाठी अंतरामध्ये 12 किमी पेक्षा जास्त सरासरी घट, टिपर/पे लोडरद्वारे पारंपारिक पद्धतीने कोळसा भरून वाहून नेताना कार्बन उत्सर्जन आणि डिझेलच्या वापरामध्ये लक्षणीय घट यांसारखे फायदे काही विशेष प्रकल्पाच्या फायद्यांमध्ये समाविष्ट आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात सहभागी होत, नवीन कोळसा खाणी सुरू करण्यासाठी इतर विभागांकडून जमीन आणि मंजुरी मिळण्यासाठीचा सध्याचा विलंब टाळावा असे आवाहन कोळसा मंत्रालय आणि कोल इंडिया लिमिटेडला केले.
या आर्थिक वर्षासाठी निर्धारित कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्याचे आणि वीज क्षेत्राला सुरळीत पुरवठा करण्याचे आवाहन, कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांनी या कार्यक्रमात कोल इंडिया लिमिटेड आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडला केले. कोळसा मंत्रालयाचे सचिव, कोल इंडिया लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले.