माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीआयडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. सीआयडीकडून परमबीर सिंग यांना दोन गुन्ह्यात समन्स बजावण्यात आले असून सोमवारी आणि मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.
मरीन ड्राईव्हमधील श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार दाखल झालेल्या गुन्ह्यासंबंधी त्यांना समन्स देऊन सोमवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तसेच मंगळवारी परमबीर यांना ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यासंबंधी हजर राहण्यासाठी समन्स देण्यात आले आहे.
परमबीर सिंग हे गुरुवारी मुंबईत दाखल झाले होते. मुंबईत दाखल होताच परमबीर हे मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११ च्या कांदिवली येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यानंतर त्यांची तब्बल साडेसहा तास चौकशी करण्यात आली. गोरेगाव येथील खंडणीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा कक्ष ११ कडून त्यांचा जबाब नोंदवला गेला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे काल ठाणेनगर पोलीस ठाण्यात चौकशीला हजर झाले. परमबीर हे स्वतः कोर्टासमोर हजर झाल्याने ठाणे कोर्टने जारी केलेला अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आला.