भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे. किरीट सोमय्या हे आज ‘एबीपी माझा’शी बोलत होते. “ध्वनी प्रदूषणाच्या नावावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मेट्रो करशेडची वाट लावली. मग आता ज्या धर्माच्या नावावर सकाळी ४ वाजल्यापासून एवढ्या डेसिबलचे भोंगे चालू का?” असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी म्हटलं की, “उद्धव ठाकरे आता अडचणीत आले आहेत. भगवे उतरवून हिरवे झाले आहेत आणि म्हणूनच त्यांना मशिदीच्या भोंग्यांची काळजी आहे,” असा टोला किरीट सोमय्या यांनी लागावला आहे. “पंतप्रधान मोदी यांनी योग्य स्थिती निर्माण केली आणि म्हणून ३७० कलम हटवले गेले, बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर निर्माण झालं. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने नियम केला की, पहाटेची अजान बंद होणार. अजान करा पण लाऊडस्पीकरची गरज काय? सर्व योग्य झाल्यास देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची काहीही गरज नाही. उद्धव ठाकरेंनी हिरवे हातात घेतलीये आणि शरणागती पत्करली आहे,” अशी घणाघाती टीका सोमय्या यांनी केली आहे.