नवी दिल्ली: देशभरासहित राज्यातही केंद्र आणि राज्य सरकारद्वारे विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. उत्तर प्रदेश सरकारने देखील राज्यातील विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठी योजना जाहीर केली आहे. ‘राणी लक्ष्मीबाई योजना’ असं या योजनेचं नाव असून अनेक विद्यार्थिनींना या योजनेचा फायदा लवकरच मिळणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत तरुणींना मोफत स्कूटी देण्यात येणार आहे.
योजना काय आहे तेजाणून घेऊया.
राणी लक्ष्मीबाई योजनेंतर्गत गुणवंत तरुणींना मोफत स्कूटी देण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात भाजपच्या जाहीरनाम्यात या मुद्द्याचा उल्लेख करण्यात आला होता. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींना मोफत स्कूटी देण्यात येणार आहे. तरुणींना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
महाविद्यालये, विद्यापीठांव्यतिरिक्त खासगी विद्यापीठांचे विद्यार्थीही या योजनेचा लाभ घेऊ शकतील. ही योजना लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. योगी आदित्यनाथ सरकारकडून हिरवा कंदील मिळताच पात्र विद्यार्थिनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
कागदपत्रांची यादी
शैक्षणिक प्रमाणपत्रं, बँक खाते, पासपोर्ट आकाराचे फोटो, जन्म दाखला, अधिवास प्रमाणपत्र आणि आधार कार्ड ही कागदपत्रं पात्र विद्यार्थिनींकडे असणं आवश्यक आहे. तसेच कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं, अशीही अट आहे.
या योजनेअंतर्गत सर्व गुणवंत विद्यार्थिनींना स्कूटी खरेदी करण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. स्कूटी मिळाल्यानंतर विद्यार्थींनीना कॉलेजला जाणं सोपं होईल. या स्कूटी योजनेच्या माध्यमातून सरकारला मुलींना थेट शिक्षणाशी जोडायचे आहे.
या आहेत अटी
-विद्यार्थींनीचं विद्यापीठ किंवा महाविद्यालयात शिक्षण सुरु असावं.
-10वी/12वी मध्ये 75 टक्के गुण असावेत.
-बँक खाते आधारशी जोडलेले असावे.
-योजनेसाठीचे अर्ज केवळ ऑनलाइन वैध असतील.
-विद्यार्थ्याने इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.