केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. राज्यात 8 दिवसात दुसरा मोठा केंद्रीय मंत्री येणार असल्यानं हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह धुळे जिल्हातील दोंडाईचामध्ये येणार आहेत. इथे राजनाथ सिंह विविध विकास कामांचे लोकार्पण करणार आहेत. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज आणि राणा प्रताप यांच्या स्मारकाचे उद्घाटन देखील होणार आहे. त्यानंतर सभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राजनाथ सिंह दुपारी बारा वाजून 40 मिनिटांनी हेलिकॉप्टरने दोंडाईचा येथे येणार आहेत. त्यांच्या हस्ते जनरल बिपिन रावत रोडचे उद्घाटन होणार असून त्यानंतर ते आमदार जयकुमार रावल यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. दुपारी दीड वाजता महाराणा प्रताप चौक येथे उभारण्यात आलेल्या महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याचे राजनाथ सिंह यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. तसेच श्रीमंत राजे दौलतसिंह रावल यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत.
दुपारी तीन वाजता शहीद अब्दुल हमीद स्मारक आणि वॉर ट्रॉफी पुतळ्याचे राजनाथ सिंह यांच्या हस्ते अनावरण होणार असून अडीच वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आणि राजपथाचेही उद्घाटन होणार आहे. याच ठिकाणी राजनाथ सिंह यांची सभा होणार असून या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आमदार शिवेंद्रराजे यांची देखील उपस्थिती असणार आहे.
राजनाथ सिंह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा लावण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी अवघी दोंडाईचा नगरी सजली असून घरोघरी तसेच रस्त्यांवर विविध ठिकाणी रांगोळ्या काढून राजनाथ सिंह यांचे स्वागत केले जाणार आहे.