जिल्हा परिषद अर्थ विभागाच्या बैठकीत शिक्षक संघाची मागणी
वेतन अनुदान मिळाल्यानंतर राज्यातील प्रत्येक पंचायत समितीमधील दिरंगाईमुळे पगारासाठीचा विलंब टाळण्यासाठी जिल्हास्तरावरून थेट शिक्षकांच्या बँक खात्यात CMP प्रणालीद्वारे पगार वर्ग करण्याची मागणी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने केल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.
पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती रणजीत शिवतरे, माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, शिक्षण समिती सदस्य मोहित ढमाले यांच्या उपस्थितीत नूतन लेखा व वित्त अधिकारी महेश अवताडे यांचे स्वागत व शिक्षकांच्या रखडलेल्या आर्थिक बाबींवर चर्चा करण्यात आली.
शिक्षकांच्या वेतनश्रेणी व सेवापुस्तकातील अन्य अपूर्ण बाबींची पडताळणी वेळेत न झाल्याने शिक्षकांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा परिषद अर्थ विभागाने तालुकास्तरावर येऊन पुस्तक पडताळणी करावी. तसेच शिक्षकांचे फंड प्रस्ताव मंजुरीसाठी होत असलेल्या विलंबामुळे शिक्षकांमधील नाराजीची माहिती जिल्हा परिषद प्रशासनास देण्यात आली. यावर उपाययोजना करत फंड मंजुरीची गुंतागुंतीची प्रक्रिया सुलभ करून ऑनलाइन प्रणालीची मदत घेण्याची मागणी शिक्षक संघाने केली आहे.
जिल्हा परिषद खातेप्रमुखांना सहीचे अधिकार नसल्याने सण अग्रीम मंजुरीसाठी विलंब लागू नये यासाठी वेळेवर उपाययोजना करून सण ऍडव्हान्स व ऑक्टोबर पेड नोव्हेंबरचा पगार दिवाळीपूर्वी देण्यांत यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली. सीएमपी पगार, ऑनलाइन फंडमंजुरी, वेतन पडताळणी शिबिरे या मागण्यांवर निर्णय घेऊन शिक्षकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू.