नवी दिल्ली: उझबेकिस्तानचे उपपंतप्रधान जमशीद खोडजाव आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यात आज नवी दिल्लीत फलदायी चर्चा झाली. बैठकीत दोन्ही देशांमधील कृषी क्षेत्रात सुरू असलेले सहकार्य वाढवण्यावर सहमती झाली.
उझबेकिस्तानचे उपपंतप्रधान म्हणून खोडजाव यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देताना तोमर म्हणाले की, खोडजाव यांचा देशाचे कृषी मंत्री म्हणून पूर्वीचा अनुभव त्यांच्या नवीन कार्यभारासाठी खूप उपयुक्त ठरेल. तोमर म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये अतिशय चांगले राजनैतिक आणि व्यापारी संबंध आहेत.
कृषी क्षेत्रात परस्पर सहकार्यावर विशेष लक्ष दिल्याबद्दल तोमर यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी माहिती दिली की भारताने उझबेकिस्तान मधील द्राक्षे, आलुबुखार आणि गोड चेरीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची अधिसूचना लवकरच प्रकाशित केली जाईल, तर भारताला आंबा, केळी आणि सोयाबीन ऑइलकेकच्या निर्यातीसाठी उझबेकिस्तान कडून मान्यता मिळाली आहे, ज्यासाठी तोमर यांनी खोडजाव यांचे आभार मानले. डाळिंब, बटाटा, पपई आणि गहू आयात करण्याची परवानगी त्वरित देण्याचे आवाहन तोमर यांनी उझबेकिस्तानला केले आहे.
तोमर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी क्षेत्राचा झपाट्याने विकास होत असून शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध पैलूंवर मोठ्या उत्साहाने काम केले जात आहे.