मंत्री विजय वडेट्टीवारांचा कर्तृत्वान अहवाल नजरेस पडल्यानंतर ते माझ्यावर माझ्यावर ५० कोटींचा दावा करायला निघाले आहेत. महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांच्या आणि ओबीसींच्या हक्काचे 125 कोटी रुपये यांना खर्च करता आले नाहीत. हे माझ्यावर 50 कोटींचा दावा करणार आहेत. पण वडेट्टीवारांनी खुशाल दावा टाकावा. मी कशालाही घाबरत नाही. कारण माझी माय आणि माझा बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा आणि आरेवाडीचा बिरोबा आहे,” असे म्हणत भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांचे आव्हान स्विकारले आहे.
दोन दिवसांंपूर्वी गोपीचंद पडळकरांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर गोसीखुर्द प्रकल्पामध्ये ठेकेदारांकडून टक्केवारी घेणे, दारूची फॅक्टरी विकत घेणे, दारूची डीलरशीप घेणे, आदी गंभीर आरोप केले. इतकेच नव्हे तर, त्यांच्या शिक्षणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर वडेट्टीवार यांनीही पडळकर यांनी आपल्यावरील आरोप सिद्ध न केल्यास ५० कोटींचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा दिला होता.
काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?
छत्तीसगडमध्ये वडेट्टीवारांची फॅक्ट्री असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. यावर संतप्त वडेट्टीवारांनी पडळकारांना आरोप सिद्ध करण्याचे थेट आव्हान दिले आहे. ” ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून आरोप करु नकोस, तुला जे काही बोलायचं असेल तर पुराव्यानिशी बोल. बेछूटपणे काही आरोप करू नकोस. कुठल्याही दुकानात माझी भागीदारी असेल, माझ्यावर लावलेला एक जरी आरोप तू सिद्ध करुन दाखवलास तर मी राजकारण सोडून देईल, पण जर तू आरोप सिद्ध करु शकला नाहीस तर तुझ्यावर ५० कोटींचा दावा दाखल करेल आणि तुला चंद्रपूर गडचिरोलीच्या चकरा मारायला लावेल, अशा इशारा वडेट्टीवारांनी दिला आहेत.
आजपर्यंत मी कोणाचा एक रुपयाही घेतला नाही, चहाचाही रुपया कधी ठेवला नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे. पण फुकटच्या प्रसिद्धीसाठी अशा प्रकारचे बेताल आणि बेछूट आरोप करण सोडून दे, जर माझी किंवा माझ्या कोणत्याही नातेवाईकाच्या नावाने छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असेल तर शोधून आण, तुझ्या नावाने ती करुन देईल. आरोप आम्हालाही करता येतात. पण राजकारणात विरोधकांचाही मान ठेवायचा असतो, त्यामुळे केलेल्या आरोपांवर माफी माग नाहीतर पश्चाताप भोगायला तयार रहा असा निर्वाणीचा इशाराही विजय वडेट्टीवारांनी दिला आहे.