नागपूर : भारतीय महसूल सेवेच्या ७४ व्या तुकडीचा समारोप समारंभ २९ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी ‘एनएडीटी’ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, ऊर्जामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष जे. बी.
महापात्रा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याकार्यक्रमासाठी शुक्रवारी सकाळी १०.२० वाजता उपराष्ट्रपतींचे आगमन झाले. त्यानंतर त्यांचा ताफा राजभवनाकडे वळेल, दुपारी चार वाजता ते ‘एनएडीटी’ च्या कार्यक्रमात ते सहभागी होतील.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर ही केंद्र सरकारच्या भारतीय महसूल सेवा (आयकर) अधिकाऱ्यांसाठी असलेली सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षाद्वारे आयआरएस अधिकाऱ्यांची निवड केली जाते. थेट निवड झालेले हे अधिकारी प्रत्यक्ष कामावर रुजू होण्यापूर्वी सुमारे १६ महिन्यांचे सेवाअंतर्गत प्रशिक्षण घेतात. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर अधिकारी प्रशिक्षणार्थींना देशभरातील आयकर कार्यालयांमध्ये आयकर विभागाच्या सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त केले जाते.
एम. व्यंकय्या नायडू आज येणार असल्याने नागपुरात पोलिसांचा कडक सुरक्षा बंदोबस्त असणार आहे.