नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी आज भारतीय वायुदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदोरिया आज सेवा निवृत्त झाले असून त्यांच्याकडून चौधरी यांनी पदाची सूत्र स्वीकारली आहेत. त्यांच्या निवडीने नांदेडसह महाराष्ट्रात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
कोण आहेत व्हीआर चौधरी?
व्हीआर चौधरींचे पूर्ण नाव विवेक राम चौधरी आहे. ते राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे (एनडीए) माजी विद्यार्थी आहेत आणि संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयातील पदवीधर देखील आहेत. या वर्षी 1 जुलै रोजी त्यांना एअर मार्शल हरजीत सिंग अरोराच्या जागी हवाई दलाचे 45 वे उपप्रमुख बनवण्यात आले. हे हवाई दलातील दुसरे सर्वात महत्वाचे पद आहे.
हवाई दलात करिअर
डिसेंबर 1982 मध्ये चौधरी यांना हवाई दलाच्या लढाऊ प्रवाहात लढाऊ पायलट म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांना मिग -21, मिग -23 एमएफ, मिग -29 आणि एसयू -30 एमकेआय सारखी लढाऊ विमाने उडवण्याचा अनुभव आहे. हवाई दलात त्यांच्या सेवेदरम्यान आतापर्यंत त्यांनी 3800 तासांहून अधिक लढाऊ विमानांचे उड्डाण केले आहे.