महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असलेल्या गोव्यात आज मतदान पार पडत आहे. गोव्यातील ४० जागांसाठी गोवेकर आज आपला कौल देणार आहेत. गोव्यात सध्या भारतीय जनता पार्टी सत्तेत असून प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार बघत आहेत. पण गोव्यात शिरकाव करत भाजपला बाजूला सारण्यासाठी तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, काँग्रेस असे सर्वच विरोधक जोर लावताना दिसत आहेत.
गोव्यात सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान पार पडणार आहे. कोविड प्रतिबंधक सर्व नियमावलीचे पालन करूनच हे मतदान पार पडेल. तर पुढल्या महिन्यात १० मार्च रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. गोव्यात सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. शनिवार १२ फेब्रुवारी पर्यंत हा प्रचार कार्यक्रम चालला असून शनिवारी संध्याकाळी प्रचार थांबवण्यात आला.
गोव्यातील ४० विधानसभा मतदारसंघात एकूण ३०१ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. तर राज्यातील ११ लाख मतदार त्यांचे भविष्य ठरवणार आहेत. या ११ लाख मतदारांमध्ये ९५९० दिव्यांग व्यक्ती आहेत. तर तब्बल २९९७ ज्येष्ठ नागरिक हे ८० वर्षाच्या वरचे आहेत. यासोबतच ९ तृतीयपंथी आणि ४१ देहविक्रीचा व्यवसाय करणारे मतदार आहेत.
भारतीय जनता पार्टीने गोव्यात मिशन २२+ अर्थात २२ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे ध्येय जाहीर केले आहे. तर तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षही गोव्यात जोर लावताना दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोवेकरांना सत्तेत आल्यावर अनेक गोष्टी मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. तर महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनाही गोव्यात हातपाय मारताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही गोव्यात जाऊन प्रचार सभा घेतल्या आहेत. पण असे असले तरीही गोव्यात पुन्हा एकदा भाजपाच सत्तेत येईल असे भाकीत वेगवेगळ्या निवडणूक मतचाचण्यांमध्ये पुढे आले आहेत