चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान, समीर वानखेडे यांना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण आणि नवाब मलिक यांच्या जावयाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून हटविण्यात आले आहे. या वृत्तानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.
वास्तविक, समीर वानखेडे यांनी असं म्हटलं की, त्यांनी स्वत: या प्रकरणातून आपल्याला हटविण्याची मागणी केल्याचे म्हटले आहे. वानखेडे यांनी असंही म्हटलं की, त्यांनी न्यायालयात एक याचिकाही दाखल केली आहे, त्या याचिकेत हे प्रकरण दिल्ली एनसीबीकडे सोपवावे, असे म्हटले होते. दरम्यान, समीर वानखेडे यावेळी असंही म्हणाले की, ‘मी मुंबई झोनचा संचालक आहे आणि राहणार.’
‘वानखेडे दिशाभूल करत आहेत’
समीर वानखेडे यांच्या या वक्तव्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे की, ‘एकतर ANI (वृत्तसंस्था) समीर वानखेडे यांचं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने प्रसारित करत आहे किंवा समीर वानखेडे देशाची दिशाभूल करत आहे. त्यांनी कोर्टात रिट याचिका दाखल करुन जबरदस्तीने वसुली आणि भष्ट्राचाराबाबत जे आरोप लावण्यात आले आहेत त्याची चौकशी सीबीआय (CBI) किंवा एनआयएकडून (NIA) करण्यात यावी, मुंबई पोलिसांकडून नाही अशी मागणी केली होती. पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली. देशाला सत्य समजलं पाहिजे’ असं ट्विट नवाब मलिकांनी केलं आहे.