आर्यन खानच्या अटकेपासून मुंबईत सुरू झालेले ड्रग्ज प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तसेच त्यामध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहे. त्यातच आता समीर वानखेडेंची पत्नी- अभिनेत्री क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस नोंदवलेली आहे, पुण्यात ड्रग्जचं प्रकरण प्रलंबित असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता समीर वानखेडेंनी मलिकांच्या दाव्यांवर स्पष्टीकरण दिले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देत समीर म्हणाले की,’क्रांतीची बहीण हर्षदा रेडकर यांच्यावरची केस ही २००८ सालची आहे. त्यावेळी मी नोकरीतही नव्हतो. तसंच क्रांतीशी माझं लग्न २०१७ साली झालं. मग माझा या प्रकरणाशी काही संबंध कसा असेल?’, असा सवाल यावेळी समीर यांनी केला आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांनी यासंदर्भात ट्वीट केले होते. ज्यात ते म्हणाले आहेत की,’समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर ही ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहे की काय? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल कारण तिच्याविरोधातली केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे.’ तसेच या ट्वीटसोबत त्यांनी या प्रकरणातले पुरावेही दिल्याचे सांगितले आहे.