चंद्रकांत पाटलांचा उपहासात्मक सवाल
राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपने अनेक वेळा घंटानाद, शंखनाद आंदोलन केले. त्यामुळे सरकारला जाग आली अन् मंदिरे उघडली. पण ६० वर्षांवरील नागरिकांना मंदिरात भजन, कीर्तनाला मनाई आहे. आता त्यांनी मंदिरात जाऊन संजय राऊतांचे अग्रलेख वाचायचे काय, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी हिंगोलीत केला.
शासकीय विश्रामगृहात भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पाटील म्हणाले की, हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही सरकारचा एकही मंत्री आला नाही. त्यासाठी आता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले पाहिजे. प्रत्येक बाबीवर प्रतिक्रिया दिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यासोबतच कोणत्याही निवडणुका बिनविरोध होऊ देऊ नका. प्रत्येक निवडणूक लढवलीच पाहिजे. वेळप्रसंगी पराभव पत्करावा लागला तरी चालेल, पण बिनविरोध निवडणूक नको, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांनी पॅकेजची घोषणा केली होती. त्यावर बोट ठेवत चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘केंद्राने सगळी मदत केल्यामुळे करोना निभावता आला. महाराष्ट्र सरकारने काय केलं? लस, एन९५ मास्क, पीपीई किट, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर, ऑक्सिजन हे सगळं केंद्र सरकारने दिलं. तुम्ही काय दिलं? फुटकं पॅकेजही दिलं नाही. रिक्षावाल्यांना १५०० रुपये देणार होते, ते अजून मिळायचे आहेत’, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.