वर्धा : आर्वीतील कदम रुग्णालयात अवैध गर्भपात प्रकरणाने संपूर्ण राज्यभर खळबळ माजविली आहे. येथे तपासात मिळालेल्या कवट्या आणि हाडांचा ‘डीएनए’ करण्याचा निर्णय पोलिस विभागाने घेतला आहे. परंतु, या हाडांचा रासायनिक तपासणीचे अहवाल अजूनही आले नसल्याने पोलिसांचा तपास इतर बाबींवर सुरू आहे. हा अहवाल येताच त्वरित या हाडांचा ‘डीएनए’ करण्याबाबत पत्र पाठविण्यात येणार आहे.या प्रकरणात कदम रुग्णालयात तब्बल ९७ लाख रुपये मिळाले होते. या संदर्भात आयकर विभागाकडून रुग्णालयाच्या मालकांना समन्स देण्यात आले आहे. त्याचा सुद्धा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
आर्वी येथील कदम रुग्णालयात १२ कवट्या आणि ५६ हाडे सापडून आता २० दिवसांचा काळ उलटून गेला आहे. हाडे आणि कवट्या या किती जुन्या आहेत याची तपासणी प्रयोगशाळेत सुरू आहे. याचा अहवाल साधारणतः ८ ते १० दिवसांत येण्याची शक्यता आहे. हा अहवाल आल्यानंतर कळेल की हाडे नेमकी कुणाची आहे, मुलाची की मुलीची. त्यामुळे, तपास रखडला आहे. हा तपास पुढे नेण्याकरिता पोलिसांना या अहवालाची प्रतीक्षा आहे. या रुग्णालयातील नवनवीन गुपितांचा शोध घेण्यास पोलिसांना यश मिळत आहे.