खासदार संजय राऊतांना गुलाबरावांचे प्रत्युत्तर
गुवाहाटी: शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. गुलाबराव पाटलांना पुन्हा टपरीवर नाही बसायला लावलं तर नाव बदलून ठेवा, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली होती. आता याच टिकेवर बोलताना गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आमची परिस्थित काहीच नव्हती. तरीही आम्हाला सर्वकाही मिळालं. शिवसेनेच्या आशीर्वादाने मिळालं. पण त्यात आमचाही त्याग आहे. आम्ही आमच्या घरावर तुळशी पत्रं ठेवली. आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत. राऊत म्हणतात मला टपरीवर पाठवू. त्यांना चुना कसा लावता माहीत नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा चुना लावू, असा इशाराच गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
गुलाबराव पाटील गुवाहाटीत आहेत. यावेळी शिवसेनेच्या इतर बंडखोर आमदारांशी संवाद साधताना त्यांनी राऊतांवर पलटवार केला. आपल्या सर्वांवर आरोप होत आहेत. ते होत असतानाही अनेक लोक आपल्या पाठीही आहे. आपल्यावर भरपूर टीका झाली. बाप काढले. आपली प्रेते आणण्याची भाषा झाली. पण आमच्या जीवनाचा संघर्ष या लोकांना माहीत नाही.
संजय राऊतांना आमची स्टोरी माहीत नाही. 92 च्या दंगलीत आम्ही तिघं भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होतो. त्यावेळी राऊत कुठे होते माहीत नाही. कलम 56 काय असते 302 काय असते हे राऊतांना माहीत नाही. हे आम्ही सर्वांनी भोगलं आहे. तडीपाऱ्या काय असतात, दंगलीच्या वेळी पायी चालणं काय असंत हे त्यांना माहीत नाही. ते बाळासाहेबांचे फोटो लावून मोठे झाले. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन क्रिया केलेले कार्यकर्ते आहोत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.