विरोधी पक्षनेते अजित पवारांना मुख्यमंत्र्याचा टोला
नाशिक : मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने वारंवार दिल्लीवारी करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ते प्रसार माध्यमाशी बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “अजितदादा गडचिरोली दौऱ्यावर थोडे उशिरा पोहोचले. देवेंद्र फडणवीसांसोबत मी गडचिरोलीच्या टोकाला गेलो होतो. पूर ओसरल्यानंतर अजितदादा गेले आहेत, उपमुख्यमंत्री फडणवीस हे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया येथे जेव्हा पूर परिस्थिती होती, तेव्हा फिरत होते. आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही. यंत्रणा लोकांच्या मदतीला आहे. युद्ध पातळीवर शेतीचे पंचनामे करण्याचा आदेश दिलेले आहेत,”
दरम्यान, अजित पवार यांनी नुकतीच गडचिरोली येथे पुरग्रस्तांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता. त्याला आज मुख्यमंत्र्यांनी नाशिक येथे प्रत्युत्तर दिले.
काल अजित पवार म्हणाले होते की मुख्यमंत्री शिंदे म्हणतात सरसकट पंचनामे करायला सांगितले पण शेतकरी म्हणतात पंचनामे झाले नाहीत. दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यावर उपाययोजना व्हायला हव्या. अन्य मागण्या कशा पूर्ण होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा.
“शेतकऱ्याना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्याचे आहे. शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. दोन ते तीन दिवसात सर्व शंभर टक्के पंचनामे होतील, आणि त्यांना योग्य ती मदत सरकारच्या वतीने दिली जाईल. स्वतः मी आणि उपमुख्यमंत्री यात लक्ष घालत आहोत,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.