“तुमच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा होईल. आम्ही कठोरात कठोर कारवाई करणार आहोत. ते आमच्यावर सोडा. त्याची तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फक्त ठणठणीत बऱ्या व्हा”, असा शब्दच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे पालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांना फोनवर संवाद साधून दिला.
महापौर नरेश म्हस्के यांनी आज रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी महापौर म्हस्के यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन लावून त्यांचं कल्पिता पिंपळेंशी बोलणं करून दिलं. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना हे आश्वासन दिलं. यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करतानाच त्यांच्यापाठी सरकार खंबीरपणे उभे असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांचा फोनवर संवाद
“जय महाराष्ट्र, नमस्कार ताई. तुमचं कोणत्या शब्दात कौतुक करावं. पण एक तुम्हाला शब्द देतो. तुम्ही जे धैर्य दाखवलं… तुम्ही बरे झाल्यावर तुम्ही पुन्हा जे काम करणार आहात, आता तुमच्या बरोबर आमची सुद्धा ती जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही लवकर बऱ्या व्हा. आरोपीला शिक्षा करण्याची चिंता करू नका. तुम्ही फक्त लवकर बऱ्या व्हा. मला रोज रिपोर्ट येत असतात. उगाच डिस्टर्ब नको म्हणून मी लवकर संपर्क साधला नाही. पण मला माहिती मिळत असते. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. बाकी बघू. आरोपींना तर कडक शिक्षा होणार. तुम्ही लवकर ठणठणीत बऱ्या व्हा,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.