बॉलिवूडमधील चित्रपट दिग्दर्शक कबीर खान याने मुघल सम्राज्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. मुघलांना कमी लेखणारे चित्रपट पाहणे हे अडचणीचे तसेच लज्जास्पद वाटते असं कबीर खान याने म्हटले होते. हिंदी चित्रपटांमध्ये लोकप्रिय कथानकानुसार हे चित्रपट बनवले जातात तसेच ते ऐतिहासिक संदर्भांवर आधारित नसतात असा आक्षेपही कबीर खानने घेतला होता. तसेच मुघलांना चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकेत पाहून आपल्याला त्रास होतो असंही कबीर खानने म्हटलं होतं. दरम्यान, आता यावरून नवीन वाद सुरु झाला आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी कबीर खान यांच्या वक्तव्यावरुन टीका केली आहे.
महाराष्ट्र भाजप नेते राम कदम यांनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. भारताच्या इतिहास ज्यांनी लोकांना त्रास दिला, त्रास दिला, लुटले, दहशत माजवली, अशा जुलमी दुष्ट मुघल आक्रमकांच्या स्तुतीसाठी कबीर खान एक वेब सीरिज बनवण्याचा प्रयत्न करत आहे असे राम कदम यांनी म्हटले आहे.
“ज्या आक्रमणकारी मुघलांनी आपल्या भारतावर आक्रमण करुन रक्तपात करत लुटमार केली. लोकांवर अत्याचा करत छळ केला. त्या मुघलांची प्रशंसा स्तुती करत त्याच्यावर वेब सीरिज बनवण्याचं धैर्य निर्माते कबीर खान करत आहेत. त्यांच्या बुद्धीची कीव येते. ते या मुघल बादशहांचा भारताच्या निर्मितीमध्ये आणि देशहितामध्ये फार मोठा वाटा आहे असे म्हणत आहेत. तैमुर आणि चंगेरचा वंशच बाबर आणि त्याच्या नंतरचे औरंगजेबापर्यंत मुघल बादशहा यांचा रक्तपात ना इतिहास विसरला आहे ना लोक विसरला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्यावर वेब सीरिज बनवा आम्ही स्वागत करु. पण हिंदू धर्मीयांचा अपमान होईल त्यांच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारच्या वेब सीरिजवर कायमची बंदी घालावी ही आमची मागणी आहे,” असे राम कदम यांनी म्हटले आहे.