देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात यावी, असा विचार सरकारकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील महाविद्यालयं येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितला होतं. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही राज्यातील जिल्ह्यांची कोरोनाची कोरोनाची स्थिती बघूनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असं सांगितलं होतं. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही लसींचे दोन्ही डोस घेऊन आपलं लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावं असं आवाहनही अजित पवारांकडून करण्यात आलं आहे.
येत्या २ ऑक्टोबरला राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थिती योग्य वाटल्यास वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबत योग्य ती नियमावली लागू करुन महाविद्यालयं टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं घेण्यात येऊ शकतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णय महत्त्वाचा असणार आहे. राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव किती आहे यावर शाळा आणि कॉलेजेस कधी सुरु होणार हे अवलंबून राहणार आहे.