राज्य सरकारकडून सणासुदीच्या काळात लादण्यात आलेल्या निर्बंधांच्या मुद्द्यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली. तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष, असा जळजळीत सवाल विचारत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे का? मग उगाच इमारती सील करण्याचा किंवा सणांवर निर्बंध लादण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात सण साजरे करण्यास आणि मंदिरं उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
मंदिरे बंद असल्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मंदिरं सुरू करा नाही तर मंदिरांबाहेर घंटानाद आंदोलन करू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. भाजपनेही कालच मंदिराच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राज यांनी आज मंदिराचा विषय हाती घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेलाच राज यांनी साथ दिल्याचं बोललं जात असून त्यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.