माजी न्यायमूर्तीं लोकूर यांनी व्यक्त केली चिंता
पीएम केअर फंडमध्ये जमा पैसा कुठे जातोय हे आम्हाला माहिती नाही ,अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन बी.लोकूर यांनी दिली. तसेच माहिती अधिकार कायद्याला कमकुवत केले जात असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.ते म्हटले आहे. माहिती अधिकार कायद्याला १६ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
काय म्हणाले माजी न्यायमूर्तीं लोकूर?
माजी न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांनी याविषयी म्हटले, ‘सामान्य नागरिक आणि बड्या उद्योजकांनी दान केलेले करोडो रुपये कसे खर्च केले जात आहेत याबद्दल सार्वजनिक स्तरावर कोणतीही माहिती उपलब्ध नाही’. ‘उदाहरण म्हणून आपला पीएम केअर फंडचं घेऊयात. यामध्येही करोडो रुपये आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांनी पैसे दान केले आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण फंडात किती पैसा आहे हे आपल्याला माहिती नाही. तो कसा खर्च करण्यात आला आपल्याला माहिती नाही. याचा उपयोग व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी केला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण वास्तवात तसं झालं का? आपल्याला माहिती नाही,’ असे जस्टीस लोकूर यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, ”२०२०-२१ मधील ऑडिट रिपोर्ट अद्याप तयार करण्यात आलेला नाही. एक वर्ष झालं आहे.आज १२ ऑक्टोबर आहे, पण ऑडिट रिपोर्टबद्दल कोणाला माहिती नाही,’ असे सांगत न्यायमूर्ती लोकूर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.जर तुम्ही पीएम केअर वेबसाईटवर गेलात तर तिथे २८ फेब्रुवारी २०२० ते ३१ मार्च २०२० दरम्यानचा ऑडिट रिपोर्ट आहे. यामध्ये चार दिवसात ३००० कोटी जमा झाल्याचे सांगण्यात आले आहे. जर तुम्ही आकडेवारी पाहिलीत तर आपण हजारो कोटींबद्दल बोलत आहोत. पण हा पैसा कुठे जात आहे? आपल्याला माहिती नाही’.