आज दि १० जून रोजी महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान होत आहे. दोन तासात १५३ जणांनी मतदान केल्याची माहिती आहे. या निवडणुकीत खरी लढत शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये आहे. दोन्ही पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. मात्र, आतापर्यंत दोन्ही पक्षांकडून अपक्ष उमेदवारांना खेचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निकालावरून कळणार आहे.
या निवडणुकीत प्रत्येक आमदाराच्या मताचे स्वतःचे महत्त्व आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नेमका धोका कुणाला? महाडिक की डॉ. बोंडे?, असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
यावेळी अमोल मिटकरी यांनी अनिल बोंडे यांच्यावर देखील टीका केली. “भाजपने अनिल बोंडे यांची अवस्था महाभारतातील शकुनी मामा सारखी करुन ठेवली आहे. तुम्ही फक्त आपल्या गटार वाणीतुन ‘भांजे’ म्हणत फक्त पासे टाकत राहा कुरुक्षेत्रावरील युद्ध श्रीकृष्ण जिंकुन देणार”, असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे.
चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाचे गिफ्ट सायंकाळपर्यंत
“भाजप कडून खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत .शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये कुठलेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीचे राज्यसभेचे सर्व उमेदवार निवडुन येतील. चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाचे हे सर्वात मोठे गिफ्ट सायंकाळपर्यंत मिळेल.” असे ट्वीट देखील मिटकरी यांनी केले आहे.
राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी भाजपचे तीन उमेदवार पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक. दुसरीकडे शिवसेनेकडे संजय राऊत आणि संजय पवार हे दोन उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी रिंगणात आहेत. आता या निवडणुकीत ४२ मतांऐवजी विजयासाठी ४१ मतांची गरज आहे. कारण अनिल देशमुख आणि मलिक यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे मतदान करता येणार नाही. तर शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे नुकतेच निधन झाले आहे.