मुंबई ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसह अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची रवानगी आता आर्थर रोड कारागृहात करण्यात आलीय. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
दरम्यान मलिकांनी पत्रकार परिषद घेत मलिकांनी आज पुन्हा एकदा काही व्हिडीओ आणि फोटो दाखवून एनसीबी आणि भाजपला तिखट प्रश्न विचारले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारती यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना एनसीबीने का सोडलं असा सवाल मलिकांनी केला आहे.
नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?
क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने तेराशे लोकांमधून 11 लोकांना पकडलं. 12 तास ही रेड चालली. ताब्यात घेतलेल्या लोकांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आलं. मात्र, अवघ्या तीन तासात वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना सोडून देण्यात आलं. यावेळी वृषभ सचदेवाचे वडील होते. अवघ्या तीन तासात त्यांची अशी कोणती चौकशी करण्यात आली? त्यांना का सोडण्यात आलं? असा सवाल त्यांनी केला आहे.