शिक्षक संघटना आक्रमक
नागपूर/ कुही : जिल्ह्यातील कुही तालुका अंतर्गत गावखेड्यातील कारभार गतिमान व्हावा, यासाठी ग्रामविकास विभागाने ७ ऑक्टोबर २०१६ च्या शासन आदेश काढत सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले. मात्र, कुही पंचायत समितीने या आदेशाची तोडमोड करून थेट मासिक सभेत ठराव घेत शिक्षकांनाच मुख्यालयी राहावे, असे फर्मान काढले. एका विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सक्तीवरून शिक्षक संघटनांत वाढता असंतोष उफाळून आला असल्याने शिक्षक संघटना आक्रमक झाल्याचे शैक्षणिक वर्तुळात चित्र आहे.
वस्तुतः तालुक्यात केवळ जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी नसून खासगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य विभागातील कर्मचारी, पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी कार्यरत आहे. इतर विभागातील एकही कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. इतकेच नव्हे तर अधिकारीही मुख्यालयी राहत नसताना केवळ जिल्हा परिषद शिक्षकांनीच मुख्यालयी राहावे अशी सक्ती का? असा सवाल शिक्षक संघटनांचा आहे.
सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे. त्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे. मी स्वतः मुख्यालयी राहून तालुक्यात सेवा देत आहो. मुख्यालयी राहण्याच्या सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
मनोज हिरूडकर, गटविकास अधिकारी, पं.स. कुही
राहण्यासाठी कुठलीही सुविधा नाही. इतर विभागातील कर्मचाऱ्यांना शासनाने क्वार्टर बांधून दिलेत. कुठलाही कर्मचारी मुख्यालयी नसतो. जिल्हा परिषद शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट घालून त्यांना वेठीस धरण्याचा हा हेतुपुरस्सर प्रकार आहे.
२०१७ च्या शासन निर्णयानुसार जे अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नाही त्यांचा घरभाडे भत्ता गोठविण्यात यावा. मात्र वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधांमुळे मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नाही.
- राजानंद कावळे, शेतकरी व कामगार नेते
गटशिक्षणाधिकारी, अधीक्षक, चपराशी यापैकी सर्वजण नागपूरवरून अप-डाउन करतात. वेळेवर कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने योजना विकासकामे बाधित होतात. हीच परिस्थिती आरोग्याबाबतसुद्धा आहे. डॉक्टर नर्सेस आरोग्यसेवक बाहेरगावावरून ये-जा करतात. अशावेळी गुरुजींना वेठीस धरणे चुकीचे असल्याचा आरोप आहे.
पत्रात वित्त विभागाच्या जीआरचा संदर्भ दिला. शिक्षक ग्रामविकास विभागाअंतर्गत येतात. मुख्यालयाबाबत ग्रामविकास विभागाचा जीआर असून त्यातील दिशानिर्देशांकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. शिक्षकांनाच नेहमी वेठीस धरले जाते, ही वस्तुस्थिती आहे.
परशराम गोंडाणे, राज्य उपाध्यक्ष, कास्ट्राइब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य