मुंबई- शिवसेना, भाजपा, काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यात संघर्ष सुरू असताना मुंबईकरांना नवा पर्याय देण्याच्या जोरदार हालचाली आम आदमी पक्षाने सुरू केल्या आहेत. दिल्ली, पंजाबमध्ये सत्ता काबिज केल्यानंतर मुंबईत पक्षाचा विस्तार करून मुंबई महापालिकेत मुसंडी मारण्यासाठी ‘आप’ चा डाव आहे. त्यातच आप दिल्ली आणि पंजाब निवडणुकांप्रमाणेच जाहीरनाम्यात विविध घोषणा करून महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे चित्र आहे त्यामुळे इतर पक्षांची कोंडी होऊ शकते.
आगामी महापालिकेच्यादृष्टीने कशाप्रकारे काम सुरू आहे यासंदर्भात आप प्रतिनिधीशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे मोफत शिक्षण, पाणी, आरोग्याच्या सुविधा देण्याचं सांगितले ते 2015 पासून आतापर्यंत आम्ही देतोय . त्याच धर्तीवर आपण पंजाबच्या जनतेला 300 युनिट वीज मोफत देतोय. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकांमध्ये पालिकांचा अभ्यास करून कशाप्रकारे महाराष्ट्रातील जनतेला त्या महापालिका अंतर्गत सुविधा मोफत व कमी दरात देता येतील त्याचा अभ्यास आम्ही करतोय. मुंबईत पाणी पट्टी , वीज आणि नागरी सुविधा मोफत देता येतील का हे आम्ही पाहतोय आणि ते आमच्या जाहीरनाम्यात नक्कीच असणार आहेत. याच लोकोपयोगी संकल्पनेवर आम्हाला लोकं प्रतिसाद देतील असे आपचे नेते धनंजय शिंदे यांनी म्हटलंय.
दिल्ली आणि पंजाबमधील मोफत वीज आणि पाण्याचे मॉडेल, मुंबई महानगरपालिकेत आजमावण्याचा प्रयत्न आम आदमी पक्षाने सुरू केला आहे. वीज मोफत देणे शक्य नसले तरी मुंबईकरांना पाणी आणि घरपट्टी तसेच अन्य सुविधा मोफत देता येऊ शकतील अशाप्रकारे जाहीरनामा बनवणार असल्याचं आपकडून समजतं.