नागपुर : नागपूरवासीयांना मिळणारी ही भेट काही साधीसुधी असणार नाहीये. नागपुरकरांचा प्रवास अधिक सहज-सोपा करणारी ही भेट निश्चितच अनोखी अशी असणार आहे. नागपुरात आता जमिनीवर नाही तर हवेत धावणाऱ्या बसेस लोकांच्या सेवेमध्ये आणणार असल्याबाबतची इच्छापूर्ती करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले, ते काल ‘बढती का नाम गाडी’ या जनजागृती अभियानात बोलत होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलंय की, नागपूरात हवेतून चालणारी केबल बस सुरू करणार आहोत, तसं सुतोवाच त्यांनी केलं आहे. दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेबाबत मागणी केली होती. त्यानंतर त्याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी उत्तरप्रदेशातील प्रयागराज पाठोपाठ नागपूरात देखील हवेतून धावणारी बस अर्थात केबल बस सुरू करणार असल्याचे जाहीर केलंय.
या बसेसच्या व्यवस्थेसाठी गडकरी यांनी आराखडा तयार करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 35 ते 40 सीटर ही केबल बस सध्या फिलिपिन्समध्ये चालवली जात असून त्याच धर्तीवर नागपूरात ही केबल बस सुरू केली जाईल, असे गडकरी म्हणाले आहेत. नागपूरातील ही केबल बस पारडीहून रिंगरोड मार्गे लंडन स्ट्रीटपर्यंत जाईल. तेथून हिंगणा टी पॉईंट, डिफेन्सवाडी येथून व्हेरायटी चौकापर्यंत पर्यंत जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.