पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद दिवसेंदिवस वाढत चालला असून यातच पक्षाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हेतर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवीन नेत्याची निवड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुजरातमध्ये नुकताच यशस्वी झालेला फेरबदलाचा प्रयोग पंजाबातही होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेले संकट थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सर्व प्रयत्न करूनही अमरिंदर सिंग आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील राजकीय युद्ध संपू शकले नाही. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर पंजाब काँग्रेस सरकारमध्ये नेतृत्वाच्या बदलाची चर्चा चंदिगढमधील आमदारांच्या बैठकीने तीव्र केली आहे. गेल्या काही महिन्यांत नवज्योतसिंग सिद्धू यांचे समर्थक समजल्या जाणाऱ्या आमदारांच्या एका गटाने अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंड पुकारले असून नव्या नेत्याची मागणी केली आहे. सुनील जाखड़, पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रताप सिंह बाजवा आणि बेअंत सिंह यांचे नातू आणि खासदार रवनीत सिंह बिट्टू अशी नावे पंजाबच्या संभाव्य नवीन मुख्यमंत्र्यासाठी लढत आहेत.