मेट्रो रेल्वेसाठी सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट उड्डाणपूलाचे बांधकाम
नागपूर: सिंगल कॉलम पिअर वर महामार्ग उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेसाठी सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट उड्डाणपूलाचे बांधकाम (3.14 किमी) करत नागपुरात विश्वविक्रम केल्याबद्दल टीम महाराष्ट्र मेट्रो आणि टीम रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे हार्दिक अभिनंदन, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या ट्विटच्या मालिकेत म्हटले आहे.
नागपुरातील डबल डेकर उड्डाणपुलावर जास्तीत जास्त मेट्रो स्थानके (3 मेट्रो स्थानके) बांधल्याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे, संपूर्ण देशासाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे, असे म्हणाले.
हा दिवस साकारण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे अतुलनीय काम करणारे अभियंते, अधिकारी आणि कामगारांचे गडकरी यांनी आभार मानले आहेत. असा विकास म्हणजे नव भारतामध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दिलेल्या वचनाची पूर्तता आहे.